Last Updated on 22 Jun 2026 9:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू समूहाचा ‘पी.एम. सूर्यघर’ योजनेसाठी मोठा निर्णय
सांगली ।
विजेच्या वाढत्या बिलाने सामान्य माणूस त्रस्त झाला असून विजेचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विजेच्या भरमसाठ बिलातून सुटका करून घेत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी सौर ऊर्जा उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले.
राजारामनगर येथे राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी व संचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,राजाराम बापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील,जनरल मॅनेंजर प्रदीप बाबर,राजारामबापू दुध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे,नेर्ले गांवचे सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,आपण पी.एम. सूर्यघर योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबात २ व ३ किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसविण्यास प्रोत्साहन देत आहोत. आपण राजारामबापू सहकारी बँकेच्या वतीने ३ किलोवॅट सोलर सिस्टीम बसविण्यास १ लाख ३२ हजार अर्थ सहाय्य करणार आहोत. यामध्ये शासनाकडून ७८ हजार अनुदान मिळणार आहे. अनुदान मिळण्या साठी साधारण ३ महिने लागतील. लाभार्थीस ५४ हजार रुपयांची कर्जफेड करावी लागणार आहे. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गावातील जास्तीत-जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे,त्यांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या संघटकांशी संपर्क करावा.
विजयराव यादव म्हणाले,आम्ही माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या वतीने १०० टक्के अर्थ सहाय्य करणार आहोत. सौर ऊर्जा ही चांगली योजना असून या योजनेचा लाभ घ्यावा.
यावेळी योगेश पाटील (कराड) यांनी पी.एम. सूर्यघर योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध मुद्द्यावर चर्चाही करण्यात आली.
याप्रसंगी सभापती उदयसिंह पाटील,उप सभापती प्रकाश पाटील,बाजार समितीचे सभापती डॉ.अशोक पाटील,महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,प्रदेश सदस्या कमल पाटील, राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार,रघुनाथ जाधव,विठ्ठल पाटील,कार्तिक पाटील,माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील, पं.स.सदस्य प्रदीप पाटील,प्रकाश पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक डॉ.प्रकाश पाटील, धनाजी पाटील,प्रशांत पाटील,राजेश पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,उरुण ईश्वरपूर शहराध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्यासह समूहातील पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी आभार मानले.










































































