नागपूर । काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटा विरुद्ध काँग्रेस अशी बंडखोरी पाहायला मिळत आहे.
यामध्ये प्रामुख्याने रामटेक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवाराविरुद्ध काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी अर्ज कायम ठेवला असून ते बॅट हे त्यांचं बोध चिन्ह आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीत महायुती मधील भाजप बंडखोर अमरीश राव आत्राम यांनी देखील अर्ज कायम ठेवला आहे. इथ त्यांची लढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी होईल. त्याचप्रमाणे पूर्व नागपूर मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या आभा पांडे लढणार आहेत. काटोल मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांच्याविरुद्ध काँग्रेसचे याज्ञवलक् जिचकार यांनी बंडखोरी केली आहे.
तर अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजप नेते तुषार भारतीय यांनी बंड केल आहे. भाजपने ही जागा राणा यांच्यासाठी सोडली होते. तसेच दर्यापूर मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात राणा यांच्या युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले निवडणूक लढणार आहेत.
सिंदखेड राजा मतदारसंघात शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर आणि अजित पवार गटाचे मनोज कायंदे हे रिंगणात आहेत. याशिवाय हिंगणघाट,वरोरा, चंद्रपूर बल्लारशा, देवरी, अर्जुनी मोरगाव साकोली, भंडारा, तुमसर अशा अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले नाहीत.