Last Updated on 04 Nov 2024 10:21 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडीचं सरकार हप्ते वसुली करणारं सरकार होतं, आमचं सरकार मात्र बहिणींच्या खात्यात हप्ते देणारं सरकार आहे, असं सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भाऊबीजेच्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडत बहिणींना मतदानासाठी साकडं घातलं.
कुर्ल्यातले उमेदवार मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पश्चिमचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते आज बोलत होते.
विरोधक लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालयात गेले, पण त्यांची याचिका फेटाळली गेली. विरोधकांच्या मते, बहिणींच्या खात्यात पैसे देणं गुन्हा आहे, मात्र हा जर गुन्हा असेल, तर असा गुन्हा आपण दहा वेळा करायला तयार आहोत, असं शिंदे यावेळी म्हणाले.
काँगेसनं निवडणुकीत फसवी आश्वासनं दिली, आणि नंतर जिथे सरकार आलं, तिथे, आश्वासन पूर्ण करता येणार नाहीत, असं सांगितलं. मात्र आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजनेचं वचन पूर्ण केलं आणि पुढेही करत राहू, असं शिंदे म्हणाले.
आता बहिणींना वर्षातून केवळ एकदाच नाही, तर दर महिन्याला भाऊबीज देणारे भाऊ सत्तेत आहेत, असं ते म्हणाले. निवडणुका संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होईल, असं शिंदे यांनी सांगितलं. याआधीचं सरकार केवळ फेसबुक वरून काम करणारं सरकार होतं. आमचं सरकार मात्र प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन त्यांची सुखं दुःखं जाणून घेणारं सरकार आहे. लोकांकडून काही घेणारं नाही, तर त्यांना देणारं सरकार आहे. अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली. लवकरच मुंबईतले सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील, आणि मग रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली वर्षानुवर्षे चालणारी दलाली आणि भ्रष्टाचार बंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
यावेळी महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर, शिवसेना उपनेत्या सौ.कला शिंदे, शिवसेना विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर तसेच शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व कुर्ला विधानसभा मतदार क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.












































































