Last Updated on 26 Oct 2024 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने शिरूर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले. स्वीप पथकामार्फत पिंपळे जगताप गावातील शेताच्या बांधावर जावून प्रत्येक मतदाराच्या भेटी घेवून मतदान जनजागृती करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगिता राजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप नोडल अधिकारी तथा शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या अधिपत्याखाली स्वीप पथकामार्फत मतदारसंघातील विविध गावात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. मतदानाचा टक्का वाढावा तसेच लोकशाहीच्या या महाउत्सवात प्रत्येक मतदाराने सहभाग नोंदवत मतदानाचे आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.
तसेच पिंपळे जगताप येथे सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थी तसेच पालकांमार्फत देखील मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून आई वडिलांना मतदान करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांना मतदानाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अतुल टाकळकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. शिक्रापूर येथील ग्रामीण भागामध्येदेखील घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत मतदान जनजागृती करण्यात आली.













































































