सरिता पाटील यांना व्दितीय, तर रेणू पाटील यांना तृतीय क्रमांक
वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
सांगली । वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कवठेपिरान येथे घेतलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेत सुनिता चौगुले यांनी प्रथम क्रमांक, सरिता पाटील यांनी व्दितीय क्रमांक,तर रेणू पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
या विजेत्या महिलांना राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, तालुका संघटक दिलशाद मुजावर, रुपाली तेली प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले,महिला राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ३० गावामध्ये ही स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांनी इको फ्रेंडली सामाजिक संदेश देणाऱ्या गृह सजावटी केल्या होत्या. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभागी होत या स्पर्धेच्या आनंद घेतला आहे.
प्रारंभी महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुनिता देशमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात स्पर्धेचा आढावा मांडला. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य पै.भिमराव माने,माजी सभापती दत्तात्रय पाटील,युवा उद्योजक सचिन पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.