अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली । दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना वर्ष 2022च्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. अष्टपैलू अभिनय आणि प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा करताना वैष्णव यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
मिथुनदांचा उल्लेखनीय प्रवास
मिथुनदा म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती श्रेष्ठ भारतीय अभिनेते, निर्माते आणि राजकारणी आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका आणि विशेष नृत्य शैलीसाठी ते ओळखले जातात. ऍक्शनपटातील भूमिकांपासून मार्मिक नाट्यमय व्यक्तिरेखांपर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.
एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ते दिग्गज, प्रतिष्ठित अभिनेता असा मिथुन चक्रवर्ती यांचा जीवनप्रवास आशा आणि चिकाटी यांनी भरलेला असून ध्यास आणि समर्पण यासह माणूस अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वप्नेदेखील पूर्ण करू शकतो, हे सिद्ध करणारा आहे, असे गौरवोद्गार वैष्णव यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगालमधल्या कोलकाता येथे 16 जून 1950 रोजी जन्मलेल्या मिथुनदांचे बालपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती. ‘मृगया’ (1976), या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. प्रतिष्ठेच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे माजी विद्यार्थी असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी अत्यंत सर्जनशीलतेने आपली अभिनयकला विकसित करत चित्रपटातील आपल्या शानदार कारकिर्दीचा पाया रचला.
मृणाल सेन यांच्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या संथाळ बंडखोराच्या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पातळीवरील गोरव प्राप्त करून दिला. वर्ष 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटातील भूमिकेने मिथुन यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली. हा चित्रपट, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर अत्यंत यशस्वी ठरला आणि या चित्रपटाने नृत्य क्षेत्रातील झळाळता तारा अशी ओळख प्रस्थापित करण्यात’ मिथुन यांना यश आले. डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन यांच्या अत्युत्कृष्ट कौशल्याचे साऱ्या जगाला दर्शन घडवलेच पण त्याच सोबत भारतीय चित्रपट क्षेत्रात डिस्को संगीताला लोकप्रियता मिळवून देणाऱ्या या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे मिथुन यांचे नाव घराघरात पोहोचले. वर्ष 1990 मध्ये अग्नीपथ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
नंतरच्या काळात, तहादेर कथा (1992) आणि स्वामी विवेकानंद (1998) या चित्रपटांतील भूमिकांसाठी मिथुनदा यांनी आणखी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले. मिथुन यांच्या विस्तृत कारकीर्दीमध्ये त्यांनी हिंदी, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तेलुगु यांसारख्या अनेक भारतीय भाषांतील साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या.
मिथुनदा त्यांच्या चतुरस्त्र अभिनयासाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नाटक ते विनोदी चित्रपट अशा अनेक प्रकारच्या अविष्कारांमध्ये अभिनयाची चमक दाखवली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
मिथुनदा यांचा दुहेरी वारसा
केवळ चित्रपट क्षेत्रातीलच कामगिरी नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील मिथुनदा यांनी समर्पित भावनेने काम केले आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिथुन चक्रवर्ती यांचे वर्णन केलेल्या. शिक्षण, आरोग्यसुविधा या क्षेत्रांमध्ये तसेच वंचित समुदायांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होऊन मिथुनदा यांनी समाजाचे ऋण फेडण्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे असे ते म्हणाले. समाजसेवा आणि प्रशासन यांच्याप्रती कटिबद्धता प्रदर्शित करत मिथुनदा यांनी संसद सदस्य म्हणून देखील काम केले आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
सुमारे पाच दशकांच्या कारकिर्दीत, मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेले असंख्य पुरस्कार तसेच सन्मान यांनी भारतीय सिनेमासृष्टीला मिथुनदा यांनी दिलेल्या लक्षणीय योगदानाला ओळख मिळवून दिली आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी नुकतेच त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. “डिस्को डान्सर” आणि “घर एक मंदिर” सारख्या उत्तम चित्रपटांचा समावेश असलेल्या त्यांच्या कारकीर्दीने लाखो लोकांचे मनोरंजन करण्यासह बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांचे नवे परिदृश्य घडवले आहे. त्यांचा प्रभाव रुपेरी पडद्याच्या पलीकडे पोहोचला असून मिथुनदा यांची चित्रपटातील कारकीर्द आणि सामाजिक कार्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिले आहे.
येत्या मंगळवारी, दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित 70 व्या राष्ट्रीय चित्रपट समारंभात मिथुनदा यांचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. या पुरस्कारासाठीच्या निवड समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश होता.
आशा पारेख
खुशबू सुंदर
विपुल अमृतलाल शाह
प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या कलात्मक प्रतिभेला मोठी मान्यता मिळण्याबरोबर अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणणारी दयाळू आणि समर्पित व्यक्ती म्हणून मिथुनदा यांच्या वैभवशाली वारशाचा देखील हा सन्मान असेल.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मिथुन चक्रवर्ती हे देशाचे सांस्कृतिक आयकॉन असून अष्टपैलू प्रतिभेसाठी पिढ्यानपिढ्या त्यांचे कौतुक केले जात आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या एक्स वरील संदेशाला उत्तर देताना त्यांनी लिहिले:
“भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल श्री मिथुन चक्रवर्ती जी यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे, याबद्दल आनंद झाला. ते सांस्कृतिक आयकॉन असून अष्टपैलू प्रतिभेसाठी पिढ्यानपिढ्या त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.”