56,200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी 30,000 हून अधिक नोकऱ्यांची निर्मिती आणि औद्योगिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी सज्ज
छत्रपती संभाजीनगर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र (बीआयए) राष्ट्राला समर्पित केले. हा भारताच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. पंतप्रधान या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले. पुण्यातील मुख्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑरिक हॉलमधून वेबकास्ट करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड आणि इतर अनेकजण उपस्थित होते.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा एक भाग म्हणून राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमा (एनआयसीडीपी) अंतर्गत 7,855 एकर परिसरात बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा परिवर्तनकारी प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरपासून 20 किलोमीटर दक्षिणेला वसलेल्या या औद्योगिक केंद्राकडे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्याची अफाट क्षमता आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
मोक्याचे स्थान: राष्ट्रीय महामार्ग-752E लगत आणि नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गापासून फक्त 35 किमी अंतरावर असल्याने बिडकीन औद्योगिक क्षेत्राला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशन (20 किमी), औरंगाबाद विमानतळ (30 किमी), आणि जालना ड्राय पोर्ट (65 किमी) असलेले हे क्षेत्र पीएम गतिशक्तीच्या तत्त्वांनुसार, विनाअडथळा मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारी आहे.
टप्प्याटप्प्याने विकास: केंद्र सरकारने एकूण 6,414 कोटी रुपये खर्चून तीन टप्प्यात हे क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.पहिल्या 2,511 एकराच्या फेज A ला 2,427 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राधान्य देण्यात आले. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडने (एमआयटीएल) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट (एनआयसीडीआयटी) यांच्याशी 51:49 भागीदारी करून विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही)स्थापन करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला.
पायाभूत सुविधांची सज्जता: बिडकीन औद्योगिक क्षेत्र आता रुंद रस्ते, पाण्याचा चांगला दर्जा, वीजपुरवठा, प्रगत सांडपाणी व्यवस्था आणि सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांनी सुसज्ज झाला आहे. या प्रमुख पायाभूत सुविधांसह हे क्षेत्र औद्योगिक आणि मिश्र वापराच्या भूखंडांच्या वाटपासाठी तयार आहे.
प्रमुख गुंतवणूक आणि आर्थिक प्रभाव
एथर एनर्जी (100 एकर), लुब्रिझोल (120 एकर), टोयोटा-किर्लोस्कर (850 एकरसाठी सामंजस्य करार), आणि जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलिटी (500 एकर) यासारख्या उल्लेखनीय कंपन्यांसह बिडकिनने आधीच गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. हे चार प्रकल्प एकूण 56,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 30,000 पेक्षा जास्त रोजगार क्षमतेचे आहेत.
बांधकाम झाल्यापासून अवघ्या तीन वर्षांत, एकूण 1,822 एकरावरचे (38 भूखंड) औद्योगिक आणि मिश्र-वापर झोनसाठी वितरीत केले आहेत. बिडकिन औद्योगिक क्षेत्राच्या विकासामुळे या क्षेत्राची सामाजिक-आर्थिक वाढ, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि जलद औद्योगिकीकरण असा एकत्रित, सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा आहे.
औद्योगिक उत्कृष्टतेच्या दिशेने एक पाऊल
बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण ही जागतिक पातळीवर भारताला उत्पादनातील महासत्ता बनण्यासाठीच्या वाटचालीतील एक गतिशील झेप आहे. हा प्रकल्प “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या सरकारच्या दृष्टिकोनाशी मिळताजुळता असून त्यामुळे परिसरातील औद्योगिक वाढीला, आर्थिक भरभराटीला आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.
औद्योगिक उत्कृष्टततेचा टप्पा गाठून रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना देत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊन बिडकीन औद्योगिक केंद्र दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.