Last Updated on 28 Sep 2024 1:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामपंचायतीला मिळणार २ कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस : गावात आनंदोत्सव
सांगली । माझी वसुंधरा अभियानांतर्गत पाच हजार ते दहा हजार लोकसंख्येच्या गावामध्ये येडनिपाणी गावाचा राज्यात पहिला तर भूमी थिमॅटिकमध्येही राज्यात पहिला क्रमांक आला आहे. हा निकाल समजताच गावात एकच जल्लोष करण्यात आला. ग्रामपंचायतीला २ कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
ग्रामपंचायतीने माझी वसूंधरा अभियान ४ मध्ये भाग घेतला होता. या अभियानांतर्गत गेली वर्षभर ग्रामपंचायतीने गावात विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक निर्मुलन, कचरा संकलन, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, वनराई वंधारे बांधणे हे उपक्रम राबविले होते. शुक्रवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावात गावाचा राज्यात पहिला क्रमांक आला. तसेच भूमी थिमॅटिकमध्येही पहिला क्रमांक आला आहे. दोन्ही प्रकाराचे मिळून २ कोटी २५ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.
हेही वाचा – माझी वसुंधरा अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम
स्पर्धेचा निकाल समजताच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी ग्रपंचायतीसमोर जल्लोष केला. तसेच यासाठी परीश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना सरपंच शामबाला माळी म्हणाल्या, गेली वर्षभर सर्व कमेटी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका या सर्वांनी घेतलेल्या परीश्रमाला य़श मिळाले आहे. ग्रामस्थांनीही चांगले सहकार्य केल्यामुळे राज्यात पहिला येण्याचा मान मिळाला.

यावेळी उपसरपंच प्रताप पाटील, माजी पं.स. सदस्य आनंदराव पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक डॉ. प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक सी. एच. पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप पाटील, ग्रामसेवक प्रकाश माळी, मोहन पाटील सर्व सदस्य, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दरम्यान, २ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथे बक्षीस वितरण होणार आहे.










































































