मुंबई | राज्यात कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्य शासनामार्फत सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षाच्या एकूण ४४८ पुरस्कार्थींचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थिती असणार आहे. रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता,नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम ), वरळी मुंबई येथे हा कार्यकम होणार आहे.
http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युटुयब चॅनेलवरुन तसेच https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM या फेसबुक पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
विविध पुरस्कार विषयी संक्षिप्त माहिती
१)डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- (संख्या-१)
कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रिया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या राज्यातील कोणत्याही एका शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन्मानित करण्यात येते.
रु.३,००,००० /- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
२)वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार- (संख्या -०८)
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामीण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्नक्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण (०८) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
रु.२,००,००० /- रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
३)जिजामाता कृषिभूषण पुरस्कार- (संख्या – ८)
राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब, तसेच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्याकार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्काराची सुरुवात केली आहे.
रु. २,००,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,
४)कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार- (संख्या-८)
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतुने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
२,००,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,
५)वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- (संख्या ८)
जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषी ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वत: शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील) वैशिष्टपूर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा-या महिला, कृषि विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.
रु.१,२०,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
६)उद्यान पंडित पुरस्कार- (संख्या-८)
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, जमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ पिके, फुल पिके, मसाला पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना मोठया प्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
रु.१,००,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
७)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- (संख्या-४०)
शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादी मधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, इत्यादींची लागवड करणे, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड, शेतक-यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण 40 (चाळीस) शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.
रु.४४,००० /- रोख रक्कम, पारितोषिक,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
८)पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,कृषि सेवारत्न पुरस्कार- (संख्या-१०)
पुरस्कार सुरु सन -२०१४
राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्यशासनाद्वारे सन्मानित करण्यात येते..
९)युवा शेतकरी पुरस्कार- (संख्या-०८)
पुरस्कार सुरु सन -२०२०
वय वर्ष १८ ते ४०
रु.1,20,000/- रोख रक्कम, पारितोषिक,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
१०)अन्नधान्य, कडधान्य, व गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
ही स्पर्धा एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करण्यात येते. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येते.
पीकस्पर्धेतील पीके : या स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश आहे.
खरीप पीके -भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल (एकूण ११ पिके)
रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके)
पिकस्पर्धा विजेते – बक्षिसाचे स्वरूप व वितरण
सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये
तालुका पातळी पहिले पाच हजार रुपये, दुसरे तीन हजार रुपये, तिसरे दोन हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले दहा हजार रुपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रुपये, राज्य पातळी पहिले पन्नास हजार रुपये, दुसरे चाळीस हजार रुपये, तिसरे तीस हजार रुपये आहे.