नवी दिल्ली | इन्व्हेस्ट इंडिया, एनआयसीडीसी, ईसीजीसी तसेच व्यापार आणि पर्यटनाशी संबंधित इतर अधिकृत संस्था यांचे प्रतिनिधी तसेच सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या रुपातील खासगी क्षेत्राचे प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यासह, ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथे व्यापार प्रोत्साहन कार्यालय स्थापन होणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मन्त्रो डॉन फॅरेल यांच्यासह अॅडलेड येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले ही कार्यालये दोन्ही देशांतील गुंतवणूकदार आणि व्यापारी संस्थांच्या दरम्यान सेतू म्हणून कार्य करतील.व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील भागीदारीत वाढ करणे यावर हा उपक्रम अधिक लक्ष केंद्रित करेल.
भारत आज मेक इन इंडिया उपक्रमाची 10 वर्षे’ साजरी करत आहे असे ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाने निर्मिती क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी समग्र दृष्टीकोन प्रदान केला असे त्यांनी सांगितले.
भारतातील मेक इन इंडिया कार्यक्रम आणि ऑस्ट्रेलियाचा मेक इन ऑस्ट्रेलिया कार्यक्रम यांच्या दरम्यान तंत्रज्ञानाचे आणि संधींचे आदानप्रदान करण्याबाबत तसेच एकमेकांशी व्यवहार करण्यासाठी व्यापारी संस्थांना प्रोत्साहन देण्याबाबत अत्यंत आश्वासक परिस्थिती आहे याची नोंद केंद्रीय मंत्री गोयल यांनी घेतली. ते पुढे म्हणाले की, शिक्षण, कौशल्यविकास, गुंतवणूक, पर्यटन, महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांतील वाढीव सहकार्य, शाश्वततेसाठी हरित अर्थव्यवस्था ही अशी क्षेत्रे आहेत ज्यामध्ये भागीदारीची लक्षणीय क्षमता आहे.
सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या (सीईसीए) माध्यमातून आर्थिक-सहकार्य आणि व्यापार कराराला (ईसीटीए) अधिक बळकटी देण्याच्या दिशेने भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रयत्नशील आहेत असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पुढे सांगितले. ते म्हणाले की ईसीटीए या करारामुळे दोन्ही देशांतील व्याप्ती संस्थांना परस्परांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे आणि त्यातून मालाच्या व्यापारामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.