Last Updated on 25 Sep 2024 7:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुरातील यशवंतराव चव्हाण विद्यालयात कार्यशाळा
सांगली । आपण खरेदी करत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांबाबत त्यांचा दर्जा,किंमत, उपयोगिता कालावधी याबाबत ग्राहकानी सतर्क रहावे, ग्राहक हक्क संरक्षण बाबतच्या कायद्यांबाबत सजग असावे; असे आवाहन भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक मनोज पवार यांनी केले.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये कॉमर्स विभाग आणि अंतर्गत गुणवता हमी कक्षातर्फे “ग्राहक जागरूकता” या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मनोज पवार (भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुबंई),हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांनी ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रबोधन होणे, जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे, या विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ग्राहकांच्या हितासाठी किंवा ग्राहकांनी व्यापाऱ्यांच्या बोगस जाहिरातीकडे आकर्षित होऊ नये,त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचा माल, एक्सपायर झालेला माल याबाबत ग्राहकानेच जागृत राहणे गरजेचे आहे. ग्राहकानेच माल खरेदी करताना मालाची खात्री करणे आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम. जाधव होते. प्रमुख उपस्थिती वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अशोक शिंदे सर होते.प्रारंभी या उपक्रमाची भूमिका आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये प्रा.ॲड. प्रियांका झोळे-पाटील यांनी सांगितली. सूत्रसंचालन प्रा. स्मिता पाटील यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. उल्का घारगे यांनी मानले.











































































