एस.डी. पाटील पतसंस्थेचा आर्थिक भक्कमतेवर भर : ॲड. धैर्यशील पाटील
सांगली । आपल्या सभासदांना 13 टक्के लाभांश देऊन आर्थिक भक्कमतेबरोबर एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेने पारदर्शक कारभारासह आपली विश्वासार्हता वाढवली आहे; असे प्रतिपादन वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी सेवकांची एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ॲड .पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे होते. संस्थेच्या प्रांगणातील सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या वार्षिक सभेतील सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. प्रारंभी राष्ट्रीय हॉकी खेळाडू संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. एस.डी. पाटील, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिग्विजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मागील इतिवृत्त वाचन प्रा.डॉ. वर्षा पाटील यांनी तर अहवाल वाचन प्रा. हर्षल पाटील यांनी केले. प्रा.डॉ मेघा पाटील यांचीही उपस्थिती होती.
ॲड.धैर्यशील पाटील म्हणाले, आपल्या पतसंस्थेने यापुढे आणखी ठेवी आणि कर्जे यांचे प्रमाण वाढवावे, आकस्मिक कर्जाची मर्यादा एक लाख रुपये केल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या कारभाराची प्रशंसा केली.
याप्रसंगी मँचेस्टर विद्यापीठातून बीएससी इन इकॉनॉमिक्स पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. देवश्री धैर्यशील पाटील हिचा तसेच एमबीबीएस उत्तीर्ण डॉ. उत्कर्षा खामकर तसेच संस्थेच्या गुणवंत सभासद पाल्यांचा तसेच सेवानिवृत्तांचा यथोचित गौरव करण्यात आला.
सत्कारमूर्ती महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार विजेते हॉकी खेळाडू संजय पाटील म्हणाले, पतसंस्थेने सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील संस्थेशी सभासदत्वाच्या दृष्टीने संलग्न ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
प्रा. डॉ.अशोक शिंदे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना; सभासदांना 13 टक्के लाभांश आणि पतसंस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाल्याचे सांगितले.
संस्थेचे संचालक प्राचार्य डॉ. अशोक पाटील, सचिव सुभाष नांगरे तसेच प्रा. सुनिता पाटील शिवराज पाटील, संतोष लोहार, विश्वास वाघमारे, दिलीप खांबे, प्रा विजयकुमार शिंदे आदींनी सभेचे संयोजन केले. या सभेमध्ये मयत सभासद कै. अमित पाटील यांच्या कुटुंबीयांना 6 लाख 47 हजार रुपयाचा धनादेश संस्थेच्यावतीने देण्यात आला. प्रा. विजयकुमार शिंदे यांनी आभार मानले.