Last Updated on 15 Sep 2024 2:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात आता बुधवारी 18 सप्टेंबर या दिवशी सुट्टी जाहीर
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी निर्णय घेतील त्याप्रमाणे सुट्टी असेल
मुंबई | राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. 17 सप्टेंबर २2024 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.16 सप्टेंबर 2024 करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्यात आली असल्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
पुणे : ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच
पुणे । राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती; ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज जारी केले आहेत.
सांगली : जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम
सांगली । सांगली जिल्ह्यात यापूर्वी अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ईद-ए-मिलाद निमित्त सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
उप सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेवून सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे नमूद आहे.
पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या अहवालामध्ये ईद-ए-मिलाद निमित्त दि. 16 सप्टेंबर रोजी 11 मिरवणुका, दि. 18 सप्टेंबर रोजी एक मिरवणूक व दि. 19 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात एकूण 8 मुख्य मिरवणुका आहेत. शासन अधिसूचनेमध्ये 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत नमूद नाही. ही वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जारी केले आहेत.
रायगड जिल्ह्यात ईद-ए- मिलादची सोमवारची सुट्टी कायम

नांदेड : ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम
नांदेड । मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीची सार्वजनिक सुटी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कायम ठेवली आहे.
यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना जारी केली असून सोमवार 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सणाची सुटी असेल असे सर्वांना सूचित केले आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात ईद-ए- मिलादची सोमवारची सुट्टी कायम
सातारा : ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी सोमवारी कायम
सातारा । राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. सातारा जिल्ह्यासाठी सोमवार दिनांक- १६ सप्टेंबर २०२४ करिता घेषित केलेली ईद-ए- मिलाद ची सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कायम ठेवण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली आहे.












































































