Last Updated on 14 Sep 2024 5:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आ.जयंत पाटील यांच्या हस्ते होणार उदघाटन; डॉ.सुरेश भोसले, प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती
सांगली । कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ,कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी) सुरू केले जात आहे.
या केंद्रातून इस्लामपूर शहरासह वाळवा,शिराळा आणि पलूस तालुक्यातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते सोमवार दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता आरोग्य केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न होत आहे. य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले या समारंभाचे प्रमुख पाहुणे असून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सध्या आरोग्य खर्च महागडा आणि सर्व सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होत चालला आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसा ला आधार देण्यासाठी माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य केंद्र उभारले जात आहे. येथे कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध रहाणार आहेत. येथे प्राथमिक तपासणी व उपचार केले जाणार असून पुढील तपासण्या,पुढील उपचार व शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटल येथे केल्या जाणार आहेत. कृष्णेस ने-आण करण्यासाठी रुग्ण वाहिकेचा सुविधा केली आहे. येथे मेडिसिन,सर्जरी, स्त्रीरोग,अस्थि रोग,कान- नाक-घसा,दंत विकार,नेत्र विकार,मनोरुग्ण, रक्त-लघवी तपासण्या आदी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. दररोज स. १० ते सा. ५ बाह्य रुग्ण सेवा मिळणार आहे.
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर.डी. सावंत,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, डॉ.एन.टी.घट्टे, डॉ.प्रकाश म्हाळुंगकर, प्राचार्य मुजावर यांच्यासह राजारामबापू समूहातील पदाधिकारी व कार्यकर्ते याकामी परिश्रम घेत आहेत.











































































