Last Updated on 13 Sep 2024 10:06 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गौरी, गणपती विसर्जनानिमित्त इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कृष्णा नदी बहे पुलावर पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून आज दुपारपासून रात्रीपर्यंत बहे (ता. वाळवा) ग्रामपंचायतीच्या सहकार्याने निर्माल्य संकलन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. जी. के. किर्दत तसेच प्रा. पी. एन. पाटील आणि ३० स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी स्वयंस्फूर्तीने शेकडोंच्या संख्येने आलेल्या घरगुती गौरी, गणपती विसर्जन तसेच काही मंडळांच्या श्री विसर्जनानिमित्त निर्माल्य संकलन केले. यासाठी बहे ग्रामपंचायतीने सहकार्य केले. ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच निर्माल्याची पुढील कार्यवाही या दृष्टीने ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष दमामे तसेच रामलिंग बेट पर्यटन विकास समिती अध्यक्षा विजयमाला संजय पाटील व स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केले.
कृष्णा नदीकाठी बहे पुलावर दुपारपासून घरगुती गौरी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने गर्दी झाली होती. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच डॉ. किर्तन व प्रा. पी. एन. पाटील तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फुर्त सहभाग घेतला.











































































