Last Updated on 04 Sep 2024 7:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन
सातारा । जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर कोयना धरण 100 टक्के भरले. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा झाला. तर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडून 28 हजार 396 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडून 28 हजार 396 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधून 2 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 30 हजार 496 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात अधिक चांगले पर्जन्यमान झाले.
गतवर्षी 95 टीएमसीपर्यंतच साठा…
जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. सरासरीच्या 70 टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली नव्हती. कोयना धरणात 85 टीएमसीपर्यंतच पाणीसाठा झाला होता. पण, यावर्षी कोयना धरण भरल्याने सिंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच वीजनिर्मितीसाठीही अडचण येणार नाही.
बुधवारी (4 सप्टेंबर) सायंकाळी पाच पर्यंत कोयना धरणात आता 105.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणामध्ये साधारण 13 मिलिमीटर, नवजा येथे 19 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 22 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 5 हजार 089 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 6 हजार 014 आणि महाबळेश्वरमध्ये 5 हजार 796 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.04/09/2024
वेळ: सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2163’06″(659.435मी)
पाणीसाठा:105.25 टीएमसी(100 टक्के)
आवक:- 15,449 क्यूसेक्स
कोयनेच्या वक्र दरवाजातून 9546 व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 11,646 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 13/5089
नवजा 19/6014
महाबळेश्वर 22/5796










































































