Last Updated on 25 Aug 2024 10:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सुधारित बातमी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई । राज्यातील सहकारी बँकांना कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदार राहतील अशी अट टाकण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा – केंद्राप्रमाणे राज्यातही लागू होणार नवीन पेन्शन योजना…
संबंधित संचालकांनी कर्ज वितरणापूर्वी बंदपत्र सादर करावयाचे आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संचालक मयत किंवा अपात्र झाल्याने नव्याने पदभार घेतलेल्या संचालकांनी पदभार घेतल्यापासून 10 दिवसाच्या आत या संदर्भात बंदपत्र द्यायचे आहे. या कर्जाची संपूर्ण परतफेड होईपर्यंत निवडून आलेल्या संचालकांकडून पदभार घेतल्यापासून 30 दिवसांच्या आत बंदपत्र द्यावयाचे आहे.
हेही वाचा – राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार…
यापूर्वी वैयक्तिक मालमत्तेवर कायदेशीर बाबींची पूर्तता करून या कर्जाचा बोजा चढविण्यात यावा अशी अट होती. त्याऐवजी वैयक्तिक आणि सामुहिकरित्या जबाबदारी टाकण्यात आली आहे.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च 2024 पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा
✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली
✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची भरीव वाढ
✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार
✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी
✅ पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार
✅ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. 7 हजार 15 कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा
✅ सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी
✅ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत
✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ
✅ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित 5 हजार कोटी निधी उभारणार
✅ ‘बार्टी’ च्या ‘त्या’ 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ
✅ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार
✅ कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ
✅ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ
✅ चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल
✅ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना
✅ पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य
✅ सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन










































































