सांगली । जोडीदाराच्या विवेकी निवडीचा विचार सर्वदूर पोहोचावा. आयुष्यभरासाठी जीवनसाथी निवडताना पत्रिका पाहण्याचा अवैज्ञानिक आणि पारंपरिक रिवाज आड येऊ नये. त्याऐवजी आवडीनिवडी आणि कर्तृत्वाला प्राधान्य दिले जावे आणि वाचनसंस्कृतीचा विचार घरोघरी पोहोचावा या प्रबोधनाच्या हेतुने स्वागत समारंभासाठी उपस्थितांना ‘पत्रिका जुळवताना’ हे डाॅ. नितिन शिंदे लिखित पुस्तक भेट देण्यात आले. निमित्त होते डाॅ. शिंदे यांचा मुलगा निखिल आणि स्नुषा अंकिता यांच्या विवाहाप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत समारंभाचे.
येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आघाडीचे कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक आणि कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेजचे प्रभारी प्राचार्य डाॅ नितीन शिंदे आणि दिपीका शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव निखील आणि मु.पो.भुरकवाडी, ता. खटाव, जि.सातारा येथील आशा आणि सयाजी श्रीरंग कदम यांची कन्या अंकिता हे उभयता भारतीय संविधानाला प्रमाण मानून नोंदणी पद्धतीने नुकतेच विवाहबद्ध झाले. विवाह संस्थेतल्या पारंपरिक रुढी, प्रथा आणि परंपरांना जाणीवपूर्वक फाटा देऊन त्यांनी सहजीवनाचा नवा पायंडा पाडला. पारंपरिक विवाह संस्कारात धान्याचे (तांदळाचे) माप ओलांडून सून गृहप्रवेश करते. यावेळी अंगणात फुलांचे झाड लावून अंकिताने घरात प्रवेश केला. या निमित्ताने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सदिच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि मान्यवरांना डाॅ. नितीन शिंदे लिखित ‘पत्रिका जुळवताना’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
लग्नावेळी पत्रिका जुळवण्यामागे असलेल्या सांस्कृतिक आणि आर्थिक हितसंबंधाचे राजकारण डाॅ. शिंदे यांनी या पुस्तकात खणून काढले आहे. मुला मुलींचे विवाह ठरवताना पालकांनी पत्रिकेवर अवलंबून न राहाता कर्तृत्वाला अधिक महत्त्व द्यावे हा हे पुस्तक भेट देण्यामागे हेतू होता. भेट देण्यासाठी या पुस्तकाची विशेष आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. एका कुटुंबाला एक पुस्तक या प्रमाणे यावेळी सातशे पुस्तकांचे वितरण झाले. इस्लामपूर येथील नाग नालंदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचे सर्वत्र वितरण केले आहे. वधूवरांना सदिच्छा देण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. एन आर पाटील , माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य आर.डी.सावंत, ॲड. बी.डी.पाटील, राजारामबापू बँकेचे चेअरमन प्रा. शामराव पाटील, अं.नि.स.चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.