Last Updated on 22 Aug 2024 7:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुरात मुक्तांगण स्कूलचा उपक्रम
अत्याचाराचे प्रसंग नक्की टाळता येतील असा उपक्रम; पालकांच्या प्रतिक्रिया
सांगली । गुड टच आणि बॅड टच बाबतची माहिती देत येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्यांचे प्रबोधन करण्यात आले. मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श समजणे गरजेचे बनले आहे. मुलं अशा प्रकारे जागृत झाली तर लहानपणी होत असलेले अत्याचाराचे प्रसंग नक्की टाळता येतील यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड अँक्टिव्हिटी सेंटर मध्ये ६ वर्षाच्या आतील मुलांना खेळातून आणि अनुभवातून शिक्षण दिले जाते. बदलापूरच्या घटनेच्या निमित्ताने पालकांच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांचे मन कोमल आणि नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने समजावून देत वेगवेगळ्या प्रसंगांना कसे सामोरे जायचे याबाबत स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
वर्षाराणी मोहिते म्हणाल्या,”लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो. त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, ते कायम सुरक्षित रहावेत. याची पालकांना चिंता सतावत असते. पालक आपल्या मुलांशी गुड टच बॅड टचबद्दल बोलण्यास टाळतात. याबद्दल आपण त्यांना कशी माहिती द्यावी, याचा विचार करतात. पालक अनेकदा मुलांना स्वतःचे सरंक्षण कसे करावे, याची माहिती देतात. समाजात कसे वागावे, गाडीवर कसे बसावे, कोणा अनोळखी व्यक्तीने काही दिले तर खाऊ नये, असे पालक सांगत असतात. पण गुड टच बॅड टचबद्दल बोलणं टाळतात पण त्यांना याबद्दल योग्य वयात माहिती देणं गरजेचं आहे.’

स्पर्श कसे ओळखावेत याचे दाखवले प्रात्यक्षिक…!
अनेकदा कोणी केलेल्या स्पर्शामुळे मुलांना अस्वस्थ वाटते. अशा वेळी त्याला बॅड टच असे म्हणतात. हे कसे ते समजावून सांगण्यात आले. चांगले स्पर्श कसे ओळखावे हे समजावून दिले गेले. शरीराच्या अवयवांची माहिती देतांना विविध कृती करून स्पर्शाबाबत माहिती दिली. चुकीच्या पध्दतीने कोणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर, त्यांना त्याच वेळी ओरडणे किंवा विरोध करण्यास शिकवले. काही लोकं चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष दाखवून मुलांना उचलून घेतात, त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श करतात. अशावेळी अमिषाला बळी न पडता, तेथून पळ कसा काढायचा हे शिकवले गेले. शिवाय घाबरून न बसता, या गोष्टी पालकांना, शिक्षकांना सांगा असे सांगण्यात आले.
मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या
अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती नसते. जर कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केले तर साहजिक त्यांना भीती वाटेल. मुलं या गोष्टी उघडपणे कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत. अशा स्थितीत मुलं खचतात. या गोष्टींचा त्यांच्या मानसिक आणि अभ्यासावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे पालकांनी नेहमी लक्ष द्यावे.
विनोद मोहिते
बालशिक्षण अभ्यासक
पालकांनो मुलांसोबत वेळ घालवा…!
अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे पालकांना मुलांसोबत वेळ देणे शक्य होत नाही. मुलांना इच्छा असूनही त्यांच्या भावना किंवा समस्या पालकांसमोर मांडता येत नाहीत. अशा स्थितीत मुलांसोबत गप्पा मारा.त्यांना नियमित दिनचर्याबद्दल विचारा. मुलांसोबत वेळ घालवा. असे केल्याने तुमच्यात एक बॉण्ड तयार होईल. जवळीकता वाढेल. ज्यामुळे मुलं तुम्हाला कोणी बॅड टच केलं तर, शेअर करण्यात घाबरणार नाहीत.
आई-वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे..!
मुलं जेव्हा ३ ते ४ वर्षांची होतील, तेव्हाच त्यांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती द्या.
इतर कोणाच्याही समोर मुलांचे कपडे काढू नका.
मुलांना समजावून सांगा की आई-वडिलांच्या शिवाय कोणीही त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला स्पर्श करू शकत नाही.
जवळचे नातेवाईक देखील त्यांच्या प्रायव्हेट पार्टसला स्पर्श करू शकत नाहीत.
जर डॉक्टरांनी पालकांच्या उपस्थितीत त्यांच्या शरीराला स्पर्श केला तर, तो एक गुड टच आहे.
पालकांना गुड टच बॅड टचबद्दल माहिती देताना अडचण येत असेल तर, त्यांना व्हिडिओद्वारे समजावून सांगा.










































































