Last Updated on 16 Aug 2024 8:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे.बुधवार 14 ऑगस्टपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरणास सुरुवात झाली आहे.आतापर्यंत तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये जमा झाले आहेत. येत्या 19 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत.
ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीयेत.त्या महिलांच्या खात्यात पुढील 4 दिवस पैसे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे.
राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या योजनेत किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, याचा आकडा सांगितला आहे.आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3 हजार रुपये लाभ जमा झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
हेही वाचा – रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली…आनंदीआनंद झाला’!
तसेच याआधी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाला आहे.अशाप्रकारे एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तर उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचा विश्वास देखील आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना लाभ
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांना तर 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते. 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील.









































































