मुंबई | महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणारा सन 2023-24 या वर्षीसाठीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना जाहीर करण्यात आला आहे, तसेच कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ईश्वरलाल परमार यांना झाला आहे. रोख 51 हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
24 ऑगस्ट 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होणार असल्याची माहिती अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव स. व. निंबाळकर यांनी दिली आहे. या पुरस्कार निवडीबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. भांड आणि श्री. परमार यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी कडून दरवर्षी कवी नर्मद यांचे नावे दोन सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतात. या दोन पुरस्कारापैकी एक पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिकांना तर दुसरा पुरस्कार जेष्ठ गुजराती साहित्यिकांना प्रदान करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी श्री. भांड आणि श्री. परमार यांची निवड करण्यात आली आहे. 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. बाबा भांड यांचे मराठी साहित्य क्षेत्रात भरीव असे योगदान आहे. त्यांच्या 9 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 4 प्रवासवर्णने, 6 ललीत गंध, 5 जीवनवृत्त, 5 अनुवाद, 25 संपादन, 16 बाल कादंबऱ्या, 25 बाल कथासंग्रह, 3 एकांकिका इत्यादी विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहेत. सन 2015 ते 2018 या कालावधीत ते मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या दशक्रिया या कांदबरी वर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.
यापूर्वी कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ साहित्यिक शंकर वैद्य, कवी ना.धों. महानोर, विजया राजाध्यक्ष, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, मारुती चितमपल्ली, आशा बगे, राजेंद्र बनहट्टी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती श्री. निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.