Last Updated on 01 Aug 2024 7:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदी कासेगावचे सुपुत्र,सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजरामनगर येथे तासगाव-कवठेमहांकाळ च्या आ.सुमनताई पाटील यांच्या हस्ते देवराज पाटील यांना निवड पत्र देण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंगभाऊ नाईक,आ.अरुणआण्णा लाड,माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अॅड. बाबासाहेब मुळीक (विटा) यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रकृती अस्वस्थामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. निवडीप्रसंगी आटपाडीचे हणमंत देशमुख,जतचे जेष्ठ नेते सुरेश शिंदे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मन्सूर खतीब,माजी सभापती किसन जानकर,दत्ताजी पाटील, कवठेमहांकाळचे टी.व्ही.पाटील,तसेच तालुका व जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.
देवराज पाटील यांनी कमी वयात सांगली जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आणि अध्यक्ष ही पदे भूषविताना जिल्ह्यात अगदी प्रभावी काम केले आहे. त्यांना लोकेनते राजारामबापू पाटील व माजी सभापती स्व.जनार्दनकाका पाटील यांचा वारसा लाभला असून त्यांनी कासेगावच्या सरपंच पदापासून आपल्या सार्वजनिक कामाची सुरुवात केली आहे. त्यांनी वाळवा पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. सध्या ते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. शांत,संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे युवा नेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवराज पाटील म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटीलसाहेब यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे,तो कामातून निश्चित सार्थ करू. पक्षाचे नेते,पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जिल्ह्यात पक्ष वाढीचा प्रयत्न करू.













































































