सातारा । सातारा जिल्ह्यात देखील पावसााचा जोर काहीसा वाढला आहे. महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात पाऊस सुरु आहे.धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 48 हजार 026 क्युसेस अशी सुरू आहे.बुधवारी (31 जुलै) सायंकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 85.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 81.67 टक्के भरले आहे.पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
2019 चा महापुराचा अनुभव लक्षात घेता कृष्णाकाठच्या लोकांच्या मनात कृष्णेला आता आलेल्या पुरामुळे धास्ती आहे.दोन दिवसात पाणी झपाट्याने वाढल्याने पूररेषेतील कुटुंबे धास्तावली होती.कोयना धरण भरत आल्याने कृष्णेच्या कार्यक्षेत्रातील सिंचन,वीजनिर्मितीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.पण,पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने कृष्णाकाठ धास्तावला आहे.
कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 40 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे.तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग 42 हजार 100 क्युसेक्सने सुरु आहे.कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये 42 हजार 100 क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस,त्यातच कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेसने सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.आज दिवसभरात बहे (ता. वाळवा) पुलाजवळ असलेल्या विस्तीर्ण पात्रात एकाच दिवसात 12 तासात सुमारे 3 फुटाने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी (31 जुलै) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 42 मिलिमीटर, नवजा येथे 44 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 19 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 85.96 टीएमसी इतका झाला असून धरण 81.67 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 675 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 312 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 014 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.31/07/2024, वेळ:सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2147’10″(654.660मी)
पाणीसाठा:85.96 टीएमसी(81.67%)
आवक:- 48,026 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 40000 क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 42,100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 42/3715
नवजा 44/4356
महाबळेश्वर 19/4033
Update – 31 July 2024, Time – 08.30 PM