छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान केंद्रावर मतदारांना विविध सुविधा द्यावयाच्या आहेत. त्यात उन्हाळ्याच्या अनुषंगाने द्यावयाचे प्रथमोपचार पेटी, पाळणा घर व व्हिल चेअर या सुविधांचा समावेश आहे. या सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यासाठी महिला बालविकास, सामाजिक न्याय व आरोग्य विभाग यांनी समन्वय राखावा,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पांडुरंग वाबळे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतदान केंद्रावर मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम आरोग्य, समाज कल्याण आणि महिला बालविकास विभागाने समन्वयाने करावे. उन्हाळ्याचा कालावधी असल्याने मतदारांना आरोग्य सुविधा,पाळणाघर आणि दिव्यांगांसाठी व्हील चेअर उपलब्ध द्याव्या. मतदानासाठी आलेल्या मतदारांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका प्रथमोपचार पेटी, महिला मतदाराच्या मुलांसाठी पाळणाघर, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात यावे,असे त्यांनी सांगितले.
डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यासह रुग्णवाहिका यांची २४ तास सुविधा उपलब्ध करून द्यावी. मतदान साहित्य वितरण करतांनाच प्रथमोपचार किट मतदान चमू सोबत द्यावयाचे आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे. सर्व साहित्य व उन्हाळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या आजारांवर प्रथमोपचार म्हणून आवश्यक औषधी, इलेक्ट्रॉल सॅचेट इ. त्या किट मध्ये असावे. तसेच लहान बालक असणाऱ्या मातांना मतदान करता यावे म्हणून त्यांच्या बाळांसाठी पाळणाघर सज्ज करावे. तेथे अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करावी. मतदान केंद्र हे सुसज्ज व सुविधांनी पूर्ण असावे जेणे करुन जास्तीत जास्त मतदारांना प्रोत्साहन मिळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.