6 रक्तपेढ्यांचा समावेश, 1111 रक्तदात्यांचे उद्दिष्ट
सांगली । इस्लामपूर येथील सेवाभावी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र दिन, कामगार दिन निमित्ताने बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉल, बहे रोड इस्लामपूर येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना कालखंडात सामाजिक आपत्कालीन स्थितीमध्ये इस्लामपूरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या कल्पनेतून या प्रतिष्ठानच्या उपक्रमांना सुरुवात झाली.गरीब, गरजू अशा सुमारे 750 लोकांना सकाळ व सायंकाळ 67 दिवस फूड पॅकेट्स त्यानंतर इस्लामपूर शहरातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट्स, कोरोना कालखंडात रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पुरवठा, इस्लामपूर जायंट्स च्या सहकार्याने पोलीस मैदानावर ओपन जिम, दिवाळीला गरजूंना- दिव्यांगांना अन्नधान्य किट, फराळ वाटप, काही गरजू रुग्णांना अर्थसाह्य; यासह अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानने सेवाभावी सदस्यांच्या; दानशूर लोकांच्या सहकार्याने सातत्याने राबविले आहेत.
गेल्या तीन वर्षापासून प्रतिष्ठानच्या वतीने गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका देखील सुरू केली आहे.या अभ्यासिकेमधून आतापर्यंत स्पर्धा परीक्षा मधून 11 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदरचे अनेक उपक्रम सुरू असतानाच गेल्या तीन वर्षापासून म्हणजे 2021 पासून ब्लड बँकांमधील रक्त टंचाईचा विचार करून प्रतिष्ठानने दिनांक 1 मे 2021 रोजी पहिले महा रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यावेळी 562 जणांनी रक्तदान केले. त्यानंतर 1 मे 2022 आणि 1 मे 2023 रोजी अनुक्रमे 905 व 914 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.
यंदाही प्रति वर्षाप्रमाणे इस्लामपूर एमआयडीसी मधील श्री. सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल मध्ये बुधवार दिनांक 1 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सध्या आपल्या सांगली जिल्ह्यात आणि कोल्हापूर, सातारा परिसरातील बहुतांश ब्लड बँकांमधील रक्त साठा देखील खूप कमी आहे.राजकीय पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरामध्ये रक्तदान करून, माणुसकीचं नातं जपावं; असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार बैठकीस प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.