Last Updated on 03 Mar 2024 9:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील निर्भय विचारमंचच्या वतीने बुधवार दि.६ मार्च रोजी निर्भय सभा आयोजित केली आहे.जेष्ठ पत्रकार निखिल वागळे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत विश्वंभर चौधरी,विधीतज्ञ असीम सरोदे हे या सभेत मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एल.डी.पाटील आहेत.इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता सभा होईल.शहरातील विविध पुरोगामी, समविचारी संघटना व पक्ष संयोजनात आहेत.
निर्भय सभा आयोजित करण्याचा हेतू असा आहे की,आज देशभरात जाती-जातीत, धर्मा – धर्मात विखारी वातावरण निर्माण केले जाते आहे. माणसा – माणसांत भेद केला जातो आहे. संविधानाला बाधा पोहोचवली जाते आहे. लोकशाहीची गळचेपी सुरु आहे आणि त्याचा धर्मांध राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. हुकूमशाही विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो आहे. देशातले लेखक, विचारवंत, पत्रकार, वक्ते, कार्यकर्ते आज मुक्त वातावरणात नाहीत. सामान्य माणसं मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. तुमच्या जगण्यावर प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष निर्बंध लादले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरु आहे. या दडपशाही विरोधात उभा राहणाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. ही परिस्थिती चिंताजनक,अराजकाला निमंत्रण देणारी आणि लोकशाहीला मारक आहे.
देशातले सत्ताधीश देश नव्या गुलामीकडे नेत आहेत.प्रश्न विचारणारे लोक त्यांना नको आहेत.अशावेळी आता पुन्हा आपल्याला नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे. निर्भयपणे आणि सनदशीर मार्गाने इथल्या सत्तेला प्रश्न विचारले पाहिजेत. तरच लोकशाही जिवंत राहू शकते. प्रश्न विचारणारे असे आवाज जेव्हा वाढत जातील, तेव्हाच या देशातला समतेचा आवाज मजबूत होईल आणि लोकशाही टिकून राहील. त्यासाठी आम्ही आपणाला ‘निर्भय बनो’ ची हाक देत आहोत. या निमित्ताने देशातल्या अस्वस्थ आणि दडपशाहीच्या परिस्थितीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने ‘निर्भय बनो’ जाहीर सभेसाठी एकत्र जमत आहोत.नागरिकांनी हातात हात घेऊन आणि ‘निर्भय बनो’ चा विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. परिवर्तनाच्या लढाईत सहभागी आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
या सभेचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड,भारतीय क्रांती दल,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ),शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ),शेतकरी कामगार पक्ष,वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पक्ष,बळीराजा शेतकरी संघटना,भारतीय दलित महासंघ,सरपंच सेवा संघ,भीम शक्ती सामाजिक संघटना,फास्टा, स्वाभिमानी शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी,सत्यशोधक समाज,दलित महासंघ,इंडियन मुस्लिम लीग,शंभूराजे प्रतिष्ठान,ऍड. सी.आर.सांगलीकर फाउंडेशन,महात्मा फुले विचार मंच हे संयोजन करत आहेत.
धनाजी गुरव,शाकीर तांबोळी,उमेश कुरळपकर,संजय बनसोडे,दिग्विजय पाटील,रवी चौधरी,शंकरराव महापुरे,अमर माने,सचिन कांबळे,प्रा.सतीश चौगुले,प्रा.नितीन शिंदे,डॉ.सुदाम माने,प्रा. एस के.माने,उमेश शेवाळे,विक्रम पाटील,प्रा.एकनाथ पाटील,अजय भालकर ,प्रा.रामभाऊ घुले यावेळी उपस्थित होते.











































































