Last Updated on 03 Mar 2024 1:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजू शेट्टींचा ‘एक व्होट आणि एक नोट’ चा नारा
सांगली । ‘एक व्होट आणि एक नोट’ तत्त्वावर आपण हातकणंगले लोकसभेची स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत.आपल्याला सामान्य लोकांचा मदतीचा ओघ सुरु आहे.नेते एका बाजूला आणि जनता दुसऱ्या बाजूला असं चित्र येत्या काही दिवसात पाहायला मिळेल.कार्यकर्त्यांनो, गाफील न राहता कामाला लागा असे प्रतिपादन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.
तांबवे (ता. वाळवा) येथे बहे-तांबवे रस्त्यावर धारा रिसॉर्ट येथे हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबीर प्रसंगी ते बोलत होते.प्रा.संजय थोरात,महेश खराडे,पोपटराव मोरे,संदीप राजोबा,ॲड.एस् यु. संदे,संजय बेले,भागवत जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ते म्हणाले, हातकणंगले लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे शेतकऱ्यांच्या जीवावर ‘एक व्होट आणि एक नोट’ या तत्त्वावर लढवणार आहोत. २२ वर्षानंतरही मतदार संघात आपल्याला निवडणुकीत उमेदवाराला पैसे द्यावे लागतात हा विश्वास मतदारांच्यात जागृत ठेवला ही गोष्ट अभिमानास्पद आहे.सांगली जिल्ह्यातील १५ लाख शेतकऱ्यांना ६५० कोटी रुपये मिळवून दिले आहेत.यावेळी आपण ही निवडणूक स्वतंत्र लढणार आहोत.वर्गणी गोळा करून सामान्य लोकं,शेतकरी ही निवडणूक हातात घेणार आहेत.त्यामुळे मला या निवडणुकीची काळजी नसल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले,प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.निवडणूक सोपी आहे असं समजू नका.आपण ईडी,इन्कम टॅक्सला भिऊन काय निर्णय घेतलेला नाही.
प्रा. संजय थोरात यांनी शेतकरी संघटना व वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले.ते म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यापक जनजागृती करण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आले आहे.असंघटित असणारा शेतकरी संघटित होऊ लागला.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे एकमेव नेतृत्व म्हणजे राजू शेट्टी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
शिरटेचे दिलीप पाटील,ॲड.एस् यु. संदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले.आभार भागवत जाधव यांनी मानले.यावेळी शंकर पाटील,उत्तम जाधव,दत्ताजी पाटील,रामचंद्र जाधव,सुशांत पाटील,प्रवीण पाटील,दिलीप जाधव,रविकिरण माने,भास्कर मोरे,संतोष शेळके,यशवंत पाटील,आप्पासाहेब पाटील,मकरंद करळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.










































































