कोल्हापूर । शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2023-24 ही योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरु, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इ.संभाव्य देशांची निवड करण्यात आली असून देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया बरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करुन त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर, शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसीत केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटीव्दारे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2023-24 ही योजना राबविण्यात येत आहे.
शेतकरी निवडीचे निकष – अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वत:च्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसेच त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र 1). शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व 18 वर्षाखालील मुले/मुली) शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी किमान बारावी पास असावा. बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटट), अभियंता, कंत्राटदार इ.नसावा.
शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक संस्थामार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषि विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस.डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा पदरेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील. शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज, इतर अनुषंगीक प्रपत्रे व कागदपत्रे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अखेर तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करावीत. तालुकास्तरावरुन पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर प्राप्त झाल्यानंतर सोडत पध्दतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येईल.
अनुदानाच तपशील – शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषि विभागामार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या खर्चाचा संपूर्ण 100 टक्के हिस्सा प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक आहे. सदरची रक्कम शेतकऱ्याने कॅशलेस पध्दतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडीत स्वत:च्या बॅंक खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, धनाकर्ष किंवा धनादेशाव्दारे प्रवासी कंपनीस अदा करणे व त्याचा पुरावा कृषी आयुक्तालय कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील. दौऱ्यासाठी तारीख निश्चित झाल्यानंतर कृषि विभागाशी संपर्क साधून दौऱ्यामध्ये निवड झाल्याचे कृषि विभागाकडून पत्र मिळाल्यानंतरच शेतकऱ्याने दौरा खर्चाची 100 टक्के रक्कम दौरा आयोजित करणाऱ्या कंपनीकडे भरणा करावी. शेतकऱ्यांना देय असलेले 50 टक्के शासकीय अनुदान अभ्यास दौरा पूर्ण करुन पतर आल्यानंतर व आवश्यक ती कागदपत्रे (प्रवासाचे विमान तिकीट, बोर्डींग पास, बॅकेचा सविस्तर तपशील इ.) दौऱ्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतरच सरळ शेतकऱ्यांच्या नावे बँक खात्यात डीबीटीव्दारे जमा करण्यात येईल. शेतकऱ्याने त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक. मंजूर अभ्यास दौरा दराव्यतिरिक्त परकीय चलनामध्ये होणारी वाढ किंवा घट व यामुळे मंजूर केलेल्या प्रवासी कंपनीच्या स्वीकृत दरामधील फरक देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ज्या महिन्यात दौरा आयोजित केला जाणार आहे. त्या महिन्यातील एक तारखेस भारतीय रिझर्व्ह बँकेचा विनीमय दर विचारात घेऊन हा फरक प्रवासी कंपन्यांना दिला जाईल. या फरकाच्या रकमेच्या 50 टक्के अनुदान (अधिकतम अनुदान रुपये एक लाखाच्या अधिन राहून) शेतकऱ्यास देय आहे. अशा परिस्थितीत वर नमूद केलेल्या शेतकरी हिश्श्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल. त्यानुसार शेतकऱ्याला एकूण प्रवासाची रक्कम प्रवासी कंपनीकडे जमा करावी लागेल. प्रवास दौऱ्यामध्ये समाविष्ठ केलेल्या बाबीव्यतिरिक्त इतर बाबींवरील खर्च शेतकऱ्याने स्वखर्चाने करावा लागेल.
राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजना सन 2023-24 च्या अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.