सांगली । राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री – Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India (MAITRI) म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे, व प्रशिक्षित व्यक्तिंची कृत्रिम रेतन व अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. यामुळे राज्यातील गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढून ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.त्यातून दुग्ध उत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाय थोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा असून यामध्ये एक महिना क्लासरुम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश आहे. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.
प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्जदार हा 12 वी उत्तीर्ण व पशुवैद्यकीय पदविकाधारक असावा, त्याचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्या कार्यालयात उपलब्ध होईल.सांगली जिल्ह्याकरिता एकूण 320 उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार असल्याचे डॉ. थोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.