Last Updated on 23 Jan 2024 9:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.यासाठी वाळवा-इस्लामपूर तहसिल कार्यालयाचे अधिनस्त तालुक्यातील एकूण ७१ (ग्रामीण) गावांमधील जवळपास ४८ हजार ४० इतक्या कुटूंबांचे सर्वेक्षण करणेसाठी एकूण ३२ पर्यवेक्षक व ४९० प्रणकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.सदर प्रगणक व पर्यवेक्षक सविस्तर प्रशिक्षित करण्यात आलेले आहेत.सदर नेमलेले अधिकारी-कर्मचारी घरोघरी जाऊन कुटूंबांची माहिती घेणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांमार्फत दि.२३ जानेवारी २०२४ ते दि.३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण होणार असुन या कालावधीत नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी (तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल, अंगणवाडी सेविका, अशासेविका, ग्रा. पं. स्टाफ, शिक्षक इ.) घरोघरी जाऊन कुटूंबाची माहिती घेणार आहेत.
नियुक्त अधिकारी आणि कर्मचा-यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.तसेच सर्वेक्षणासाठी MSBCC Survey मोबाईल अॅप तयार करणेत आले आहे.
सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीव्दारे भरुन घेतली जाईल. कुटूंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुंटुबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही. सर्वेक्षण कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात.तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती देऊन सर्वेक्षणास सहाकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.











































































