Last Updated on 23 Jan 2024 10:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणा साठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती.या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे इस्लामपूर मतदारसंघात अंतिम मतदार यादीत नव मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती वाळवा-इस्लामपूरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला आहे.
या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत २ लाख ७५ हजार १५५ मतदारांची नावे समाविष्ट आहेत.तसेच नवीन मतदार ६ हजार ७९७ समाविष्ट झाले आहेत.व १२ हजार ८४१ मतदारांची विहित पद्धतीने वगळणी करण्यात आली आहे.महिला बचत गट,अंगणवाडी सेविका, महिला महाविद्यालये यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९५६ वरून ९६६ इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये २ हजार ७५७ मतदारांची नव्याने भर पडली आहे,तसेच २० ते २९ या वयोगटात २ हजार ४४ मतदारांची वाढ झालेली आहे.प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या १ हजार१० होती ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत ३ हजार ७६७ इतकी झालेली आहे.विविध सामाजिक संस्था,महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे.त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती.सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली.
त्या
नुसार ७ हजार ९४८ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.त्यांपैकी ऐशी पेक्षा अधिक वय असलेले ३हजार ३८१ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावे ही वगळण्यात आलेली आहेत.त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये २ हजार ६३२ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज- PSE) असल्याचे निदर्शनास आले,त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत ७३१ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे.
तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज-DSE) ९९३ मतदार आढळून आले.त्यांची सखोल तपासणी करून ३०७ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत.तसेच स्थलांतरित व आढळून न आलेले मतदार असे एकूण ८ हजार ६०४ मतदार यांना टपालाद्वारे नोटीस बजावणी करण्यात आली आहे.ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन,स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून,तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे.नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष-१लाख ३६ हजार ८७३, स्त्री १ लाख ३२हजार २३४ व तृतीयपंथी -४
एकूण २ लाख ६९ हजार १११ इतकी मतदार संख्या आहे.
मतदार यादी जितकी सर्व समावेशक तितकी वंचित समाज घटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते.त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी आष्टा व महादेवनगर इस्लामपूर येथे विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांका सोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.त्यामुळे पूर्व नोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिमयादी प्रसिद्ध झाल्या नंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updation) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.
दिनांक २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही.तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरूनआपला मताधिकार सुनिक्षित करावा, असे आवाहन गतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वाळया इस्लापूर व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार वाळवा-इस्लामपूर यांनी केले आहे. सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल, तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि ‘योटर हेल्पलाइन अॅप’ यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.











































































