पुणे । ऊसतोडणी मजुरांना ऊस तोडणीच्या मजुरीत 34 टक्के वाढ आणि मुकादमाच्या दलालीत एक टक्क्यांनी वाढ करण्यात आली.साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय घेतला.
पुण्यातील साखर संकुलमध्ये साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.अपेक्षित दरवाढ न दिल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशारा ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी दिला होता.पंकजा मुंडे,राज्य साखर महासंघाचे पी. आर. पाटील,राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,आ.जयंत पाटील,हर्षवर्धन पाटील,सुरेश धस,ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. एल. कराड यांच्यासह ऊसतोडणी कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऊसतोड कामगार संघटनांच्या मागणीवर विचार विनिमय करण्यासाठी या अगोदर साखर संघ आणि ऊसतोड कामगार यांची बैठक मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झाली होती.त्यावेळी ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 29 टक्के वाढ करण्याची तयारी साखर संघाने दर्शविली होती.मात्र,ऊसतोड कामगारांनी 40 टक्के दरवाढीची मागणी केली होती.यावर तोडगा न निघाल्याने शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा लवाद यासंबंधी निर्णय घेईल,असा निर्णय घेण्यात आला.त्यावेळी नाराज झालेल्या ऊसतोड कामगारांनी यासंबंधी निर्णय घेण्याकरिता 5 जानेवारी अखेरची मुदत दिली होती.