Last Updated on 31 Dec 2023 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राम मंदिराच्या उभारणीने सुरु होणारे नव वर्ष महाराष्ट्रासाठी उत्साहवर्धक असेल
मुंबई | अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात आहे. कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण होत आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे.
नव्या महाराष्ट्राचे चित्र
आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीने प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की, महायुती सरकारने राज्यात दुर्बल, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला यांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक निर्णय घेतले आहेत, एकीकडे उद्योग, पायाभूत सुविधा वाढवतांना सामाजिक न्यायाचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदार, उद्योगपतींचं ओढा दिवसागणिक वाढतो आहे. नुकतेच आपण परकीय गुंतवणुकीत परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. नव्य वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत. एमटीएचएल, कोस्टल रोड, मेट्रो, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरु होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं १ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल, असा विश्वास मला वाटतो.
विकासासाठी नव्या संकल्पना सुचवा
मुख्यमंत्री म्हणतात की, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणे यासाठी देखील आपण एक मोठे व्हिजन ठेवले आहे. ही सगळी वाटचाल एकट्याने नाही तर आपल्या सर्वांच्या सहभाग आणि योगदाने होणार आहे. विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवा, आपले विचार नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील.
सर्वांच्या सहभाग, सहकार्यातून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया

महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राखूया… छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल कायम ठेवूया… जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंगभेदाच्या भिंती तोडून टाकूया… अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-प्रथा-परंपरा नष्ट करुया… सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचारांचा अंगिकार करुया… आपल्या सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून मजबूत, प्रगत महाराष्ट्र घडवूया..,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळत्या २०२३ वर्षाला निरोप देऊन नव्या २०२४ या वर्षाचे स्वागत करत असताना सिंहावलोकन करण्याची गरज आहे. मागील वर्षात अपूर्ण राहिलेले संकल्प नव्या वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया. २०२३ वर्ष राज्यासाठी आव्हानांसोबत यशाचे वर्ष होतं. शेतकरी बांधवांच्या कष्टांमुळे कृषी प्रगती, कामगारांच्या श्रमांमुळे औद्योगिक प्रगती अखंड सुरु राहिली. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने उल्लेखनीय यश मिळवले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल राहिला. राज्याची सामाजिक वीण अधिक घट्ट झाली. हे सर्व संचित घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. नवीन २०२४ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातल्या इच्छा-आशा-आकांक्षा पूर्ण होवोत. सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध होवो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.









































































