Last Updated on 28 Dec 2023 3:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत इतर राज्यांतील शेती उद्योगाची माहिती मिळावी यासाठी शेतकऱ्यांची राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
राज्याबाहेर अभ्यास दौरा राबविताना शेतकऱ्यामध्ये फलोत्पादनविषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी,शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे,आधुनिक लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादनविषयक शेती उन्नत करणे या वाढीसाठी राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.
अभ्यास दौरा राबवताना भेटीच्या ठिकाणांमध्ये परराज्यातील कृषि विद्यापीठ, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खासगी कंपन्या, संस्था, कृषि विज्ञान केंद्र, फळबाग, भाजीपाला, फुले लागवड,विदेशी फळपीक लागवड,आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल.तसेच शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इत्यादीबाबत इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात आपले अर्ज सादर करावेत.
अभ्यास दौऱ्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 7 दिवसांचा राहील,यामध्ये प्रवास खर्च, निवास व भोजन व्यवस्था,प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा समावेश राहील.लाभार्थी 18 ते 65 वर्षे वयोगटातील असावा तसेच प्रतिलाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्याला स्वतः करावा लागेल,असे कृषि कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.











































































