सांगली । देशातील सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात,या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवली जात आहे.या योजनेअंतर्गत 1356 उपचारांकरिता प्रति कुटुंब,प्रति वर्ष रु. 5 लाखांचे वैद्यकीय संरक्षण दिले जाते.या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख 27 हजार 352 आयुष्मान कार्ड काढले आहेत.ही माहिती योजनेचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.
डॉ. कदम म्हणाले,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड (ई-कार्ड ), फोटो ओळखपत्र (आधार कार्ड) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.या योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची संपूर्ण कार्यवाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा अथकपणे करत आहे.या योजनेंतर्गत फक्त गोल्डन कार्डसाठी 2011 च्या सर्वेक्षणानुसार सामाजिक,आर्थिक व जातीनिहाय (SECC) जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण 18 लाख 44 हजार 24 कार्ड काढणे अपेक्षित आहे.त्यापैकी आतापर्यंत 7,27,352 कार्ड काढली आहेत.
डॉ. कदम म्हणाले,आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माणाची व वितरणाची गती वाढविण्याकरिता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील 1331 आशांना लॉगिन आय डी दिले आहेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या आतापर्यंत 1000 लॉगिन आय डी मिळाल्या आहेत.शहरी भागातील 263 लॉगिन आय डी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
डॉ. कदम म्हणाले,दि. 23 जुलै 2023 च्या राज्य शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांना प्रति कुटुंब 5 लक्ष रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे.आता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये एकूण1357 आजार समाविष्ट करण्यात आले आहेत.त्याचा लाभ घेण्याकरिता आयुष्मान कार्ड (गोल्डन कार्ड) असणे आवश्यक आहे.अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र आयुष्मान कार्ड काढून देतात.तसेच आशा व सर्व आपले सरकार सेवा केंद्रात विनामूल्य कार्ड काढून देण्याचे काम चालू आहे.
आयुष्मान कार्ड प्राप्त करण्यासाठी शिधापत्रिका/मा.प्रधानमंत्री महोदयांचे पत्र व आधार कार्ड घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र,आशा वर्कर्स आणि योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयास भेट द्यावी.तिथे आपली EKYC करून आयुष्मान-कार्ड निर्माण केले जाईल.त्यानंतर हे कार्ड आशा वर्कर मार्फत आपल्या घरी पोहोच केले जाईल.हे कार्ड मिळाल्यानंतर आपण योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता.
योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे काम पाहत आहेत.या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 39 रूग्णालये सूचिबद्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन शासकीय रूग्णालये आहेत.या योजनेंतर्गत कॅन्सर,हृदयरोग शस्त्रक्रिया,मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया,मेंदू व मज्जासंस्था विकार,अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया,प्लास्टिक सर्जरी, जळीत,स्त्रीरोग,बालरोग,त्वचारोग,नेत्रशस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून),कृत्रिम अवयव,फुफ्फुस,आजारावरील उपचार,सांधे प्रत्यारोपण (गुडघा व खुबा), मूत्रपिंड विकार,मानसिक आजार इत्यादी 1356 उपचारांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.तसेच,आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी आहात कि नाही हे जाणून घेण्यासाठी beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधून Ayushman ॲप डाउनलोड करावे.रुग्णालयात कोणतीही समस्या असल्यास आरोग्यमित्रास भेट द्यावी किंवा निःशुल्क दूरध्वनी क्रमांक – 155388/18002332200 वर संपर्क साधू शकता.एकूणच गरजू कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही उपयुक्त अशी योजना आहे.