Last Updated on 13 Dec 2023 9:23 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे.त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते.गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. घशाचा कर्करोग झाल्याने त्यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची ही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. नियमित उपचार करून त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने राहत्या घरीच त्यांचे निधन झाले.
रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते.लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.रवींद्र बेर्डे यांनी केवळ चित्रपटच नाही, तर रंगभूमी देखील गाजवली होती.वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली.रवींद्र बेर्डे यांनी ‘भुताची शाळा’, ‘गंमत जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘खतरनाक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या होत्या.तीनशेहून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले आहे.त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.रवींद्र बेर्डे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत.अशोक सराफ,विजय चव्हाण,महेश कोठारे, विजू खोटे,सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली.आजवर त्यांनी विविधांगी भूमिका केल्या आहेत.मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे.रवींद्र बेर्डे यांनी सिंघम,चिंगी सारख्या हिंदी सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.














































































