सातारा । रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्याच्या ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य सचिन नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली सैदापूर (ता. कराड) येथील बनवडी फाट्यावर आज,शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनासोबत बैठक घेत तडजोड केलेला 3100 रुपयांचा दर मान्य नसल्याचे सांगत दुसरा हप्ता म्हणून मागील ५०० रूपयेच पाहिजेत,तसेच यंदा पहिली उचल ही एफआरपी अधिक 500 रूपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत,अशी रयत क्रांती संघटनेची मागणी आहे.या मागणीवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे येत्या चार दिवसात दर जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा सचिन नलावडे यांनी यावेळी दिला.
नलावडे म्हणाले, गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाशी तडजोड करत मान्य केलेला 3100 चा दर चुकीचा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत असून यावर्षीच्या उसाला पहिली उचल 3500 रुपये मिळालीच पाहिजे.एफआरपी अधिक 500 रूपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रति टन 500 रुपये अधिकचे मिळाले पाहिजेत.तसेच ऊस दरासोबत दुधाला 35 रुपये प्रति लिटर दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी नलावडे यांनी केली.
दूध दराचा अध्यादेश फाडून निषेध
या आंदोलनात राज्य शासनाने दूध दरासाठी काढलेला परंतु दूध संघ आणि संस्थांनी वाटाण्याच्या अक्षता लावलेला राज्य शासनाचा अध्यादेश फाडून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.