सांगली । ऊसदर प्रश्नी शनिवारी रात्री आठच्या सुमारास बहे व नवेखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत बहे येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर रोखले.तर नवेखेडमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या टायर फोडल्या.तर बहे यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व कारखाना समर्थकांमध्ये वादावादी झाली.
गत हंगामातील ४०० रुपये द्या आणि चालू गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करा.मगच ऊसतोडणी करा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात आक्रमक पवित्र घेतला आहे.गेल्या आठ दिवसांपासून ठीकठिकाणी संघटनेचे आंदोलन सुरु आहे.काही ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते व कारखाना समर्थकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.आज,शनिवारीही बहे व नवेखेड येथे संघटनेने ऊस वाहतूक रोखली.तर ट्रॅक्टर तयार फोडले.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर निघाले होते.येथील बसस्थानकाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील,प्रवीण पाटील,सर्जेराव पाटील,नितीन हुबाले,राजेंद्र पाटील आदी कार्यकर्त्यांनी हे ट्रॅक्टर अडवले.त्यावेळी कारखान्याने पाठवलेले काही लोक तेथे आले.यावेळी त्यांच्यात व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.कार्यकर्ते ट्रॅक्टर सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते.कार्यकर्त्यांनीही आक्रमक पवित्र घेतला.आधी ऊसदर जाहीर करा आणि मगच ऊसतोड करा अशी कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली.वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले.लोकांची गर्दीही वाढली.काही संचालकांनी फोनाफोनी केली.तरीही संघटनेचे कार्यकर्ते ट्रॅक्टर सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेवटी पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर हे ट्रॅक्टर सोडण्यात आले.
नवेखेड- पुणदी रस्त्यावर शनिवारी रात्री कृष्णा नदीच्या पुलावर हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची चारही टायर फोडल्या.त्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे काहीकाळ वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.
शेतकरी भावांनो, ऊसतोडणी घेऊ नका…
दहा वर्षांमध्ये यंदा उसाचे उत्पन्न कमी आहे.त्यामुळे कारखानदारांना अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे.शेतकऱ्यांनी ही संधी सोडू नये..तरी शेतकऱ्यांनी ऊसतोड घेऊ नये. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी चांगला भाव मिळेल.
भागवत जाधव,
वाळवा तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना