Last Updated on 09 Nov 2023 7:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी मंत्री सदाभाऊ खोत व आ.गोपीचंद पडळकर यांच्या शिष्ठाईला यश
मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसकट 6 हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे.एसटी कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना 6 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे.शिंदे सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे.गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता.
राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाच्या बेमुदत आमरण उपोषणावर विविध मागण्यांसंदर्भात आ.गोपीचंद पडळकर आणि माजी आ. सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.त्यानुसार खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येईल.त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल
यावेळी परिवहन सचिव श्री. जैन, रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने तसेच शिष्टमंडळामध्ये संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी,प्रकाश कांबळे,बापू हराळे,आशिष बाळासराफ,अनुप खैरनार,सौ. पद्मश्री राजे इत्यादी उपस्थित होते.या बैठकीत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.
या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय असे :
1) एसटी कर्मचारी व अधिकारी त्यांना सरसकट 6 हजार रुपये (सहा हजार रुपये) सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर.
2) खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती.
3) सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी शासन बैठक घेऊन निर्णय घेणार.
4) कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका,जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करून एस टी कर्मचाऱ्यांची रुग्णालयाची बिले महामंडळ देय करणार.
5) घरभाडे भत्ता, महागाई भत्ता,वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत 30 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येईल.
6) एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी 900 कोटी रुपये देण्यात आले.
7) शिस्त आवेदन पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक केली असून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत निर्णय घेणार.
8) रा. प. कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एका महिन्यात रोख रक्कम अथवा उत्तम दर्जाचा कपडे देण्यात येणार.
9) अनुकंपा तत्त्वावरील व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत 30 दिवसांचे विशेष अभियान राबवून नियुक्ती देणार.









































































