Last Updated on 05 Dec 2023 10:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ग्राहकांनी मिठाई, खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे असते.त्याचबरोबर ग्राहकांनी स्वीट मार्टमधून मिठाई घेताना त्या मिठाईच्या बाजूला बेस्ट बिफोरचा बोर्ड आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. हा बोर्ड पाहिल्याशिवाय वेगवेगळे गोड पदार्थ खरेदी करू नयेत.मिठाई कधी बनवली आहे याचा अंदाज येत नसेल तर खरेदी न करणे योग्य होईल.
ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाई, इतर अन्न पदार्थांची खरेदी केली जाते.ग्राहकांनी असे अन्न पदार्थ खरेदी करताना योग्य ती दक्षता घेणेही तितकेच महत्वाचे असते.

सणासुदीच्या काळात उत्सवादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात.यामध्ये मोठ्या प्रमाणात खवा,दूध,खाद्यतेल,तूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. मागणी जास्त आणि आवक कमी,अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळीचे प्रकार केले जातात.
उत्पादकांनो…या सूचनांचे पालन करा
🌑 मिठाई ट्रेवर दर्शनी भागात वापरण्या योग्य दिनांक टाकावा.
🌑 अन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी.
🌑 अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा व त्यांची खरेदी बिले जतन करावीत.
🌑 भांडी स्वच्छ व आरोग्यदायी झाकण असलेली असावीत.
🌑 अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
🌑 अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत.
🌑 त्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी.
🌑 मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्य रंगाचा १०० पी.पी.एम च्या मर्यादित वापर करावा.
🌑 प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावेत.
🌑 अन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळेस तळण्यासाठी वापरण्यात यावे.
🌑 त्यानंतर वापरलेले तेल रुको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावेत.
🌑 आदी सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.
🌑 उघडयावरील मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये,
🌑 फेरिवाल्याकडून खवा (मावा) खरेदी करणे टाळावे.
🌑 माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे.
🌑 तसेच, त्याची साठवणूक योग्य तापमानास /फ्रिजमध्ये करण्यात यावी.
🌑 बंगाली व तत्सम मिठाईचे सेवन शक्यतो ८-१० तासांच्या आत करावे.
🌑 मिठाईवर बुरशी आढळून आल्यास तिचे सेवन न करता ती नष्ट करावी.
🌑 मिठाई खराब झाल्याची शंका असल्यास अथवा चवीत फरक जाणवला तर त्याचे सेवन न करता मिठाई नष्ट करावी.
हेही ठेवा लक्षात…
✪ स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून करु नये.
✪ विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री बिलावर एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करावा.
✪ विक्रेत्यांनी दूध, दुग्धजन्य पदार्थ,खवा, मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षितरित्या करण्यात यावी.
ग्राहकांसाठी सूचना
- मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना नोंदणीधारक अथवा परवानाधारक अस्थापनांकडून खरेदी करावी.
- योग्य तारखेची नोंद पाहूनच खरेदी करावी.
- मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये.
ग्राहकांनो…येथे करा तक्रार
ग्राहकांनी देखील जागरूक राहून अन्न पदार्थाच्या गुणवत्ता दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी.












































































