Last Updated on 20 Sep 2023 10:44 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख (वय 44) यांचे आज मंगळवारी निधन झाले.महसूल प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ.देशमुख यांच्या निधनाचे वृत्त कळताच महसूल विभागात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते किडनी विकाराने त्रस्त होते.कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या पंधरा दिवसापासून उपचार सुरु होते.पण,आज सायंकाळी उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.डॉ.देशमुख यांचा महसूल प्रशासनात कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून दबदबा होता.महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच ते सामान्य जनतेशीही आपुलकीने बोलत असत.
डॉ.देशमुख हे 2009 बॅचचे उपजिल्हाधिकारी होते.डॉ.देशमुख हे कडेगाव तालुक्यातील अंबक हे गावचे असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांनी यापूर्वी पंढरपूर,माळशिरस,इस्लामपूर येथे प्रांताधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले होते.तर डॉ. देशमुख यांनी यापूर्वी कडेगाव प्रांताधिकारी म्हणून काम केले होते.गेल्या तीन महिन्यापूर्वी पुन्हा याच ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली होती.निवासी उपजिल्हाधिकारी सांगली येथेही काम केले होते.
डॉ.देशमुख यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 21) सकाळी नऊ वाजता कराड येथील वैकुंठधाम येथे होणार आहे.
दरम्यान,डॉ.देशमुख यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री कराड येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































