Last Updated on 05 Nov 2023 7:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सर्वसामान्यांना सुख,समृद्धी मिळू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे
राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन
मुंबई | गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करुन प्रतिष्ठापना केली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस उत्साहाचा असून विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. यावर्षीदेखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे. जी सार्वजनिक गणेश मंडळे नियमानुसार गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, मंडपासाठी शुल्क आकारणी करु नये अशा सूचना प्रशासनाला दिल्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात होणार असून याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. भारताचे नाव जगभरात उज्ज्वल होत असून तो लौकिक अजून वाढविण्यासाठी गणपती बाप्पा प्रधानमंत्री श्री. मोदी यांना बळ देतील, आशीर्वाद देतील असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या जनहिताच्या विविध निर्णयांचे स्वागत केले.

हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना नियम बाजूला ठेवून मदत केली. मदतीची रक्कम दुप्पट मदत केली. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजारांची मदत, एक रुपयात पिकविमा दिला आहे. संकट काळात शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

मुंबई | गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन
नवी दिल्ली | ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया ’च्या घोषाने कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदन आज निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली. महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.
महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील परिसरात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होऊन गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३० मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.
गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितिक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठीसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.









































































