Last Updated on 12 Sep 2023 7:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जालना । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा दिला.मराठा आरक्षण ही लढाई फक्त पाटील यांची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे.केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौदा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.रविवारी जाहीर केल्याप्रमाणे राजू शेट्टी यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील व इतर आंदोलकांची भेट घेतली.या आंदोलनाला मी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज आरक्षणासाठी झटतो आहे.आता त्यांचा अंत सरकारने पाहू नये.राज्यातील व दिल्लीतील नेते मंडळी यांनी आरक्षण कसे लवकर देता येईल याचा विचार करावा.तातडीने निर्णय घेऊन आरक्षणाचा जीआर काढावा,अशी मागणीही शेट्टी यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षण मिळू नये यासाठी काही झारीतील शुक्राचार्य मराठा आरक्षणात अडचणी आणतात,कोर्टात जातात असा आरोपही शेतात यांनी यावेळी केला.जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी,अशी विनंतीही शेट्टी यांनी केली.यावेळी प्रा.डॉ प्रकाश पोपळे,सचिन पाटील,भाऊसाहेब थोरात,कृष्णा साबळे,रवि मोरे,किशोर ढगे,रवींद्र इंगळे,जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल हिप्पिरगे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रवी मोरे,मराठवाडा अध्यक्ष गजानन बगाळे-पाटील,परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते










































































