Last Updated on 11 Sep 2023 7:18 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । समाजाचं पाठबळ आणि व्यवस्थेला अन् सरकारला भिडण्याच्या ताकदीवर मराठा आरक्षणाचा लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटलांना माजी खासदार राजू शेट्टी हे पाठिंबा देणार आहेत.त्यासाठी ते उद्या (सोमवारी) दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटी येथे पोहोचणार आहेत.
राजू शेट्टी हे शिरोळ निवासस्थान येथून सोमवारी (दि.11 सप्टेंबर रोजी) सकाळी सहा वाजता निघणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षातील ज्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना राजू शेट्टी यांच्यासोबत यायचे आहे त्यांनी सांगोला मंगळवेढा,सोलापूर,तुळजापूर येथे सामील व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले आहे.दरम्यान,राजू शेट्टी यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी दोन दिवसापूर्वी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली आहे.
दरम्यान,मराठा आरक्षणाचा लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या तीन हजार लोकसंख्येच्या गावात सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल देशभरातील माध्यमांना घ्यावी लागली.जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती, पण त्याचा वणवा संपूर्ण राज्यात पेटेल अशी अपेक्षा कुणी केली नव्हती.जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यापासून 25 किमी अंतरावर असलेल्या अंतरवाली सराटीने इतिहास घडवला.मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील समस्त मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला आहे.










































































