Last Updated on 12 Aug 2023 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चेन्नई । आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या अंतिम फेरीत भारताने मलेशियावर 4-3 अशी मात केली.भारतीय संघाने चौथ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.रोमहर्षक फायनलमध्ये भारत एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होता,त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत जबरदस्त पुनरागमन केले.चौथ्या क्वार्टरमधील चौथ्या गोलमुळे भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.
आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे,तर मलेशियाने कधीही हे विजेतेपद पटकावलेले नाही.मात्र,संघाने पाच वेळा तिसरे स्थान पटकावले आहे.

हाफ टाइमपर्यंत मलेशियाचा संघ 3-1 ने आघाडीवर होता. त्याआधी जुगराज सिंगने नवव्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची कामगिरी घसरली आणि मलेशियाने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले.14 व्या मिनिटाला अझराई अबू कमालने केलेल्या फील्ड गोलच्या जोरावर मलेशियाने बरोबरी साधली.
यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये 18 व्या मिनिटाला राहीझ राजीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि 28 व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीनने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिक करून आपल्या संघाला भारताविरुद्ध 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने काही सोपे पेनल्टी कॉर्नरही गमावले.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पुनरागमन केले.भारतीय संघाने एका मिनिटात दोन गोल करत स्कोअर 3-3 केला. हाफ टाईमनंतरही भारताने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले.सामन्याच्या 45 व्या मिनिटाला भारताच्या काउंटर अटॅकवर मलेशियाने फाऊल केला,यावर रेफ्रींनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला.यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर 3-3असा केला.
त्याच मिनिटाला गुरजंत सिंगने काउंटर अटॅकवर मैदानी फील्ड करत स्कोअर 3-3 असा केला. चौथ्या क्वार्टरच्या 56 व्या मिनिटाला भारतीय संघाने चौथा गोल केला.आकाशदीप सिंगने प्रतिआक्रमण करत उत्कृष्ट फील्ड गोल केला.अशाप्रकारे टीम इंडिया चॅम्पियन ठरली.
यापूर्वी भारताने 2011, 2016 आणि 2018 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते,कारण अंतिम सामना रद्द झाला होता टीम इंडिया पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे.या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.भारतीय हॉकी संघाला आता हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.अशा स्थितीत या विजयाने भारतीय खेळाडूंचे मनोबल नक्कीच उंचावले आहे.

भारताकडून जुगराज सिंह (9′), हरमनप्रीत सिंह (45′), गुरजांत सिंह (45′) आणि आकाशदीप सिंहने (56′) गोल केले.









































































