सांगली । वाळवा तालुक्यातील बहे येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला.बहे येथील इनाम शेतात शेतकऱ्यांसमोरच हा थरार प्रकार घडला.
बहे येथील इनाम शेतात शेळ्या चारण्यासाठी अंकुश गोरख मंडले,रोहित संजय मंडले व गोरख भीमराव मंडले हे शेतकरी गेले होते.तेथे पेठ ओढ्याजवळ शेळ्या चरत होत्या.सायंकाळी साडेचारच्या सुमारास ओढ्याजवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका बेसावध शेळीवर झडप टाकून हल्ला केला.या शेतकऱ्यांना बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे दिसले.त्यांनी आरडाओरडा केला.या आरडाओरड्याने शेळीला तेथेच सोडून बिबट्याने तेथून धूम ठोकली.बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी जखमी झाली आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांनो, तक्रार करा आता ‘या’ WhatsApp क्रमांकावर !
बहे सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला.वनरक्षक अश्विनी वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.यावेळी अशोकराव देशमुख,कृष्णा मंडले,रामा मंडले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान,बहे परिसरात बिबट्याचे शेतशिवारात वरचेवर दर्शन घडत आहे.कृष्णाकाठावरील बहे,हुबालवाडी,खरातवाडी,फार्णेवाडी आदी कृष्णा नदीकाठच्या शेत-शिवारात गेल्या सहा महिन्यात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.मागील सहा महिन्यात बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.हुबालवाडी तसेच तांबवे येथील शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.बहे,फार्णेवाडी परिसरात बिबटे व बछड्यांची संख्या नेमकी किती आहे हे सांगता येत नाही.