Chandrayaan 3 Launch : संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान -3 ने आज (14 जुलै) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्री हरिकोट येथील सतीश धवन आंतरिक्ष केंद्रातून अवकाशात झेप घेतली.
भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली.‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला.
आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. श्रीहरीकोटा येथे देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या समुदायाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली.
देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.
चांद्रयान-3 (Chandrayaan-3) इस्रोच्या विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत प्रक्षेपित केले जात आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत.यात मंगलयान, चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 यांचा समावेश आहे.जवळपास 4 वर्षांपूर्वी विश्वासनीय रॉकेट एलवीएममार्फत चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आले होते. मात्र,काही तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान -2 व्यवस्थित उतरु शकले नाही. त्यामुळे ही मोहीम त्यावेळी अयशस्वी ठरली होती.त्यानंतर आज पुन्हा एकदा चांद्रयान -3 ने अवकाशात झेप घेतली.
चंद्रावर जात असलेले इस्त्रोचे चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.आतापर्यंत या ठिकाणी कुठलेही यान पोहोचलेले नाही.त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ भारताच्या चांद्रयान-3 मोहीमेवर लक्ष ठेवून होते.चांद्रयान 2 मध्ये अपयश मिळाल्यानंतर भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत तंत्रज्ञानात किती पुढे आहे हे दाखवून देण्याची एक मोठी संधी मिळणार आहे.
बाहुबली रॉकेट’ द्वारे चांद्रयान-3 चे प्रक्षेपण
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून करण्यात आले आहे. बाहुबली रॉकेटची उंची 43.5 मीटर आणि वजन 6.4 लाख किलो आहे. तसेच हे भारतातील सर्वात वजनदार रॉकेट आहे.या रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या यशाचा दर 100 टक्के आहे. याशिवाय लाँच व्हेईकल मार्क म्हणजेच LVM-3 रॉकेटचे वजन 642 टन असून याचे वजन सुमारे जवळपास 130 हत्तींच्या वजनाइतके आहे. तर रॉकेट LVM-3 तयार करण्यासाठी इस्रोला 15 वर्षे लागली असून इस्रोने बनवलेले हे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे.हे रॉकेट हेवी लिफ्ट प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाते.तसेच चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणासाठीही LVM-3 वापरण्यात आले होते.
चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला आहे : पंतप्रधान
चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे कौतुक केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला आहे . प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत उंच भरारी घेतली आहे.
ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. त्यांच्या धाडसाला आणि कुशाग्र बुद्धिमत्तेला मी सलाम करतो!”
भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई | चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातदेखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या, अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.