मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
कराड : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वेळोवेळी पुढे ढकलण्यात आलेली पंचवार्षिक निवडणूक घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. यासंबंधात न्यायालयाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास आदेश दिले असल्याची माहिती कारखान्याचे सभासद आणि याचिकाकर्ते डॉ. अजित देसाई (रा. काले) यांनी दिली.
याबाबत डॉ. देसाई यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रतही दिली असून यासंबंधात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ते म्हणतात, कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत सहा महिन्यापूर्वीच संपली आहे. या कारखान्याची निवडणूक गेल्यावर्षीच होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना महामारीमुळे सर्वच सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यावर्षीच्या सुरुवातीस निवडणूक होणे अपेक्षित होते, परुंतु कार्यकाल संपलेल्या सहकारी संस्थाची संख्या मोठी असल्याने कृष्णा कारखान्याची निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत संभ्रम होता. त्यामुळेच यासंबंधात उच्च न्यायालयात निवडणुकीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याच पिठासमोर पश्चिम महाराष्ट्रातील आणखी सहकारी संस्थाच्या याच विषयासंबंधातील याचिका प्रलंबित होत्या. कृष्णा कारखान्यासंदर्भात जी याचिका होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. याप्रकरणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, राज्य सरकार आणि कॄष्णा कारखान्यास प्रतिवादी करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने दि. 2 फेब्रुवारी रोजी निवडणुका घेण्यासंदर्भात एक आदेश काढला होता. तथापि याचिकाकर्ता व सभासद या नात्याने प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही अजून सुरु झाली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याच विषयात न्यायालयाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास स्पष्ट निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली.
न्यायालयाने ही मागणी ग्राह्य मानून बुधवारी यासंबंधी निर्णय दिला. न्यायालयाने कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरु करा असा स्पष्ट आदेश दिला आहे. या आदेशाची प्रत राज्य सरकार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, साखर आयुक्त आणि कारखाना यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी डॉ. अजित देसाई यांच्यावतीने ऍड. चेतन पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कारखान्याची निवडणूक कार्यक्रम तातडीने होणार आहे, असे डॉ. देसाई यांनी म्हटले आहे.