Last Updated on 13 Jun 2023 3:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजुर
मुंबई | राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, प्रधान सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आजच्या बैठकीत शेतकरी, कंत्राटी ग्रामसेवक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून १५०० कोटीची मान्यता देण्यात आला आहे.
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ,आता मिळणार 16 हजार रुपये
कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळत होते.ते थेट 16 हजार रुपये करण्यात आले आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी अनेकदा मागणी झालेली होती. मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे
मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन सुधारित दाराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी 8 हजार 500 तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठीही राज्य मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे : (संक्षिप्त स्वरुपात)
⏩ सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार; १५०० कोटीस मान्यता.
⏩ कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय; आता मिळणार १६ हजार रुपये.
⏩ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.
⏩ पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.
⏩ लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
⏩ पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
⏩ अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
⏩ मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
⏩ स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली.
⏩ चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.









































































