Last Updated on 30 May 2023 10:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यास एक महिन्याची मुदतवाढ
बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हिरमोड
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । राज्य सरकारने राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यास एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.मे अखेरीस बदल्या होतील या अपेक्षेने बदल्यांकडे डोळे लावून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
राज्यात मध्यंतरी महसूल विभागातील तसेच पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.पण,त्यानंतर पोलीस दलातील तसेच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही झालेल्या नाहीत.राज्यातील पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांसह सहाय्यक निरीक्षक,उपनिरीक्षक आदी पोलीस अधिकारी बदल्यांच्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत.इतर विभागातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याही बदल्या रखडल्या आहेत.पोलीस दलातील तसेच अन्य विभागातील अनेकांची ‘पोस्टिंग’ साठी धावाधाव सुरु होती.तर काहींची आजही सुरु आहे.बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये कही ख़ुशी,कही गम अशी अवस्था झाली आहे.
राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी ‘क्रीम पोस्टिंग’ मिळण्यासाठी देव पाण्यात घातले होते अन् आहेत.तशी काहींनी फिल्डींग लावल्याचीही चर्चा होती.गेल्या काही दिवसांपासून बदलीसाठी अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या होत्या.काही अधिकाऱ्यांच्या राजकीय नेते मंडळींशी भेटीगाठी सुरु असल्याचीही चर्चा सुरु आहे.तर काही नेतेमंडळी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
मे महिना हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कालखंड असतो.राज्यातील अनेक अधिकारी-कर्मचारी अजूनही बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.बदल्यांची यादी तयार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.पण,या बदल्यांना मुहूर्त मिळेना झाला होता.बदल्यांचे घोडे मात्र अडले आहे.काही बदल्यांसाठी राजकीय नेत्यांचा दबाव आहे त्यामुळेही बदल्यांची प्रक्रिया पुढे जात असल्याचीही चर्चा आहे.त्यातच आता राज्य सरकारने राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यास एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.महाराष्ट्र शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,2005 मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात.तथापि, सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील दि. 31 मे 2023 पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. 30 जून 2023 पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे असे शासनाने आज (मंगळवारी) काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
बदल्यांना महिनाभर मुदतवाढ दिल्याने महिनाभर बदल्या लांबतील अशी भीती अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आहे. वेळेत बदल्या झाल्या नाहीत तर अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा,नवीन ठिकाणी राहण्याचा व इतरही प्रश्न निर्माण होत आहेत.त्यामुळे वेळेत बदली प्रक्रिया पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









































































